Sunday, October 24, 2010

मिडास राजा : महेंद्रसिंग धोनी


                  इतिहासात एक राजा होता मिडास नावाचा, त्याने हात लावला की सगळ्याचे सोने व्हायचे त्याप्रमाणे आता धोनी म्हटलं की संघ जिंकणार हे समीकरणच होऊन बसले आहे. ९० च्या दशकात भारतीय संघ म्हणजे सचिन तेंडुलकर अशीच ओळख होती. काही फ्लूक वगळता आपली जिंकायची फारशी तयारी नसायची. आपण जिंकू शकतो हा विश्वास आपल्या संघात आणला तो सौरव गांगुलीने. २००० ते २००५ या वर्षांत गांगुलीने  एका चांगल्या संघाची पायाभरणी केली. झहीर, युवराज, हरभजन हे त्याच्याच काळात उदयास आले. आज हेच खेळाडू आपल्या संघाचा अविभाज्य घटक होऊन बसले आहेत. आपण जिंकू शकतो हा विश्वास जसा गांगुलीने निर्माण केला तसा आपण हरणार नाही हा विश्वास धोनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण करत आहे.  त्याला सर्वोत्तम कर्णधार वगैरे म्हणणे थोडे घाईचे ठरेल, त्याला तेवढा वेळ आपण दिला पाहिजे तसेच ३ वर्षात धोनीने केवळ विजयाची चव चाखली आहे, अजून अपयश त्याने पाहिले नाहीये.
              २००७ चा इंग्लंड दौरा संपता संपता द्रविडने कर्णधारपद सोडले आणि भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला - आयसीसी वर्ल्ड टी२० साठी. कप्तान म्हणून धोनीची ही पहिलीच परीक्षा होती. संघ पण  तरुण, अननुभवी होता. साहजिकच भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हणून कोणी गृहीत धरले नव्हते. ही स्पर्धा जिंकून धोनीने आपल्या कप्तानपदाचा श्रीगणेशा केला. आता जेंव्हा एकदिवसीय  सामन्यांसाठी कर्णधार निवडायची वेळ आली तेंव्हा साहजिकच धोनीचं  नाव सगळ्यात पुढे होतं, सचिनला कप्तान करा असा देखील सूर निघाला पण खुद्द सचिनने सांगितले की आता ही धुरा तरुण खेळाडूकडे सोपवा.
धोनी एकदिवसीय संघाचा कर्णधार : पहिली स्पर्धा ऑस्ट्रेलिया मधील तिरंगी स्पर्धा. ही ऑस्ट्रेलियामध्ये होणारी शेवटची तिरंगी स्पर्धा होती . भारताने पहिल्या दोन्ही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला  लीलया पराभूत केले आणि प्रथमच ही स्पर्धा जिंकली. कसोटी संघाचा कर्णधार अनिल कुंबळे निवृत्तीकडे झुकलेला असल्याने धोनी आता कसोटी कर्णधार होणे ही केवळ औपचारिकता राहिली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ  आपल्याकडे आला तेंव्हा ती पूर्ण झाली. कुंबळे आणि गांगुलीने निवृत्ती जाहीर केली आणि कर्णधार म्हणून धोनीची 'कसोटी' सुरु झाली. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन कसोटी जिंकून देऊन बोर्डर-गावस्कर चषक भारतातून परत जाणार नाही याची दक्षता घेतली. त्यानंतर सुरु झाली विजयाची घोडदौड - आशिया कप, श्रीलंका, इंग्लंड यांचे भारत  दौरे, आपला न्यूझीलंड दौरा, सगळीकडे आपण विजय मिळवले. धोनीने पहिल्या ११ कसोटी सामन्यात एकही पराभव स्वीकारला नव्हता आणि आत्तापर्यंत त्याने केवळ २ कसोटी सामने गमावले आहेत (कर्णधार  म्हणून). गेल्या वर्षी आपण कसोटीमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि ते स्थान अजूनही अबाधित आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाला व्हाईट-वॉश देऊन आपण ऐन ऍशेसच्या तोंडावर त्यांना पराभवाची चव चाखायला लावली. आज एकदिवसीय मालिका पण खिशात टाकून आपण कांगारूंना हात हलवत मायदेशी पाठवले (सुनील गावस्कर म्हणतात की गेल्या संपूर्ण शतकात कांगारूंना असे कोणी परत पाठवलेले त्यांना आठवत नाही!!!) कप्तान म्हणून धोनीने अजून तरी एक पण कसोटी मालिका गमावलेली नाहीये पण आता खरा कस लागणार आहे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये. कॅप्टन कूल अशी बिरुदावली मिरवणारा धोनी मैदानात नेहमीच शांत असतो, कितीही बिकट परिस्थिती असेल किंवा कितीही चांगली परिस्थिती असेल तरी  धोनीच्या चेहऱ्यावरचे चित्र बदलत नाही :) सहकाऱ्यांवर तो कधी आगपाखड करताना दिसत नाही (अजून पण गांगुली, कुंबळे एखाद्या खेळाडूकडून फिल्डिंग मध्ये चूक झाली की वैतागतात, खरं तर त्या दोघांनाही तो नैतिक  अधिकार नाहीये!!! असो ... )
                         नेहमी दिसणारे चेहऱ्यावरचे 'कूल' भाव
         
             कर्णधाराच्या कामगिरीने सगळ्यांना आदर्श घालून दिला पाहिजे. कर्णधारपदाचा बोजा सहन न होऊन त्याचा वैयक्तिक कामगिरीवर परिणाम झाल्याचे आपण अनेक खेळाडूंच्या बाबतीत पहिले. खुद्द सचिन तेंडुलकरला देखील अपयशाचा सामना करावा लागला. अजून तरी धोनीच्या खेळातून असे जाणवले नाहीये. (याचे एक उदाहरण आयपीएल विषयी बोलताना पाहू) आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत गेले  वर्षभर तो अव्वल स्थानावर टिकून होता . यष्टीरक्षक म्हणून त्याला मैदावर सगळ्यात फीट असावे लागते. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट मध्ये (टी२०, एकदिवसीय, कसोटी) यष्टीरक्षकाचे काम सोपे नसते.  प्रत्येक  चेडूवर एकाग्रता अबाधित राखणे आवश्यक असते तसेच सारखी उठ-बस करावी लागते.
                             यष्टिरक्षण - अजून एक आव्हान

परिपक्वता
             
आपण एका राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करत आहोत याची जाणीव धोनीला असल्याचे नेहमी जाणवते. वादग्रस्त विधाने करणे किंवा मॅच रेफ्रीची नजर राहील असे काही करणे धोनी कटाक्षाने टाळताना दिसतो. खिलाडूवृत्तीने पराभव (कधी झालाच तर !!!!) स्वीकारताना तसेच त्यातून झालेल्या चुकांमधून बोध घेताना तो आपल्याला दिसतो. युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेला संघ पुढे घेऊन जाणे इतके सोपे नाहीये पण अजून तरी धोनीचे कोणाशी खटके उडाल्याचे ऐकीवात नाही. सर्व संघ-सहकाऱ्यांशी त्याचा मैदानावर तसेच मैदानाबाहेर  चांगला संवाद असल्याचे जाणवते.  ड्रेसिंग रूममधल्या गोष्टी मिडियाच्या हाताला लागणार नाही याची पुरेपूर काळजी धोनी घेत असल्याचे दिसून येते.  कॅप्टन कूल प्रमाणेच सध्या आपल्याला कोच कूल गॅरी कर्स्टन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गुरु गॅरी आणि धोनी यांची चांगलीच भट्टी जमलेली दिसत आहे. 

आयपीएल
              २००७ मध्ये विश्वविजेते झाल्यावर आपल्या देशात टी२० ची लोकप्रियता चांगलीच वाढली, त्याला कॅश करण्यासाठी सुरु झाली एक नवीन स्पर्धा - आयपीएल. पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये धोनीला  सर्वाधिक किंमत देऊन चेन्नई सुपर किंग्सने विकत घेतले आणि साहजिकच अजून एका संघाची धुरा धोनीच्या खांद्यावर आली. त्याच्या मिडास स्पर्शाची चुणूक इथे पण दिसून आली आणि देशी-परदेशी खेळाडूंना हाताशी धरून त्याच्या संघाने अंतिम फेरी गाठली. शेन वॉर्नच्या संघाने बाजी मारल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याची कसर चेन्नई संघाने या वर्षी भरून काढली - "सर्वोत्तम कर्णधाराकडून सर्वोत्तम खेळाडू पराभूत" असे अंतिम सामन्याचे वर्णन केले गेले. आयपीएल जिंकल्यावर आता जगात सर्वोत्तम असल्याचे दाखवून देण्याची एक संधी आली आणि ती म्हणजे चॅम्पियन्स लीग. गेल्या वर्षी आयपीएलचे सर्व संघ साखळी सामन्यातच पराभूत झाले त्यामुळे आयपीएल मधील खेळाच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण झाले होते. यंदा शेवटच्या दोन्ही सामन्यात लीलया विजय मिळवून धोनीच्या चेन्नई संघाने आपण चॅम्पियनोंके चॅम्पियन असल्याचे सिध्द केले.   एक सामना लक्षात राहिला तो म्हणजे पंजाब आणि चेन्नई मधला. आयपीएलची उपांत्य फेरी गाठण्यासाठी चेन्नई संघाला सामना जिंकणे अनिवार्य होते आणि शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती, धोनीने इरफानला २ वेळा मैदानाच्या बाहेर भिरकावले आणि सामना एकहाती जिंकून दिला.(धोनी २९ चेंडूत नाबाद ५०) तिथेच चेन्नईची विजयी घोडदौड सुरु झाली. मग आयपीएल आणि नंतर चॅम्पियन्स लीग. परंतु आता पुढील आयपीएलसाठी नव्याने लिलाव होणार असल्यामुळे हे खेळाडू परत एकत्र पाहायला मिळणे कठीण आहे. पुन्हा नव्याने संघ उभा करण्याचे अजून एक आव्हान धोनीसमोर असेल .


येत्या वर्षात आपल्या संघासमोर दोन खडतर आव्हाने आहेत - एक म्हणजे दक्षिण आफ्रिका दौरा आणि त्यानंतर उपखंडात होणारी विश्वकरंडक स्पर्धा.  या दोन्ही दौऱ्यांमध्ये धोनीची कसोटी लागणार यात काही  शंका नाही. विश्वकरंडक जिंकून धोनी  स्वतःला सर्वश्रेठ सिध्द करणार का ? (आणि आपला संघ सचिनला मौल्यवान  भेट देणार का!!) हे आता पहायचे. आगामी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी त्याला शुभेच्छा


जय हो !!! 


~अमेय 

Saturday, August 7, 2010

क्रिकेटेतर खेळांची दुरावस्था


आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन होणार आहे. स्पर्धा अवघ्या महिन्यांवर आली असल्यामुळे साहजिकच जोरदार वातावरण निर्मिती चालू आहे. पण जे वातावरण तयार झाले आहे ते खेळांना आणि खेळाडूंना नक्कीच पोषक नाहीये. रोज नवीन वाद समोर येत आहेत, रोज भ्रष्टाचाराची नवीन घटना उघडकीस येत आहे. आपल्याकडे खेळ या सामान्य नामापुढे केवळ एकच विशेष नाम येते : क्रिकेट!!!. बाकीच्या खेळांकडे लक्ष दिले जात नाही किंवा बाकीच्या खेळांचा विकास होत नाही अशी पुंगी नेहमी वाजते. आता आपण बघूयात बाकीच्या खेळांमध्ये आणि क्रिकेट मध्ये एवढी दरी का निर्माण झाली आहे ते.

कोणत्याही खेळाचा विकास होण्यासाठी पातळ्यांवर काम करावे लागते. एक म्हणजे मैदानात चांगला खेळ करून सामान्य जनतेचे लक्ष खेळाकडे वेधून घेणे. तुम्ही सारखेच जिंकत राहिलात तर प्रसारमाध्यमे, क्रीडाप्रेमी यांचे लक्ष तुमच्याकडे जाणारच, त्यांना त्या खेळाची आवड निर्माण होणारच,
सातत्याने चांगली कामगिरी करून लक्ष वेधून घेतलेल्या काही खेळाडूंची नावे इथे मला नमूद करावीशी वाटतात - विश्वनाथन आनंद, साईना नेहवाल, लिएंडर पेस, महेश भूपती.

भारताला
ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत वैयक्तिक पदके मिळाली आहेत
खाशाबा जाधव (रौप्य, १९५२ हेलसिंकी)
लि
एंडर पेस (कांस्य, १९९६ अटलांटा)
कर्नाम मल्लेश्वरी (कांस्य, २००० सिडनी)
राज्यवर्धन राठोड (रौप्य, २००४ अथेन्स)
अभिनव बिंद्रा (सुवर्ण, २००८ बीजिंग)
विजेंदर कुमार (कांस्य, २००८ बीजिंग)
सुशील कुमार(कांस्य, २००८ बीजिंग)

ऑलिम्पिक
संपल्यावर यातील प्रत्येक खेळाडू हा केवळ सत्कार स्वीकारण्यात गुंतलेला दिसला. यशाची चव जरूर चाखावी पण धुंदी चढू नये. यातील एक तरी नाव (लिएंडर पेस सोडून) आपण पुन्हा ऐकले का? किंवा स्पर्धेच्या आधी ऐकलं होतं का? किती लोकांना राज्यवर्धन राठोडने पदक जिंकण्यापूर्वी "डबल ट्रॅप शूटिंग" नावाचा क्रीडा प्रकार माहित होता? मग आम्ही हे यश म्हणजे योगायोग समजावं का? (याचा अर्थ असा नाही की यश मिळवण्याची या खेळाडूंची लायकी नाही) आपल्याकडे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी "पदक मिळवणारे संभाव्य खेळाडू" म्हणून कोणाचेच नाव पुढे येत नाही याचे कारण म्हणजे आपल्या खेळाडूंना आपली तयारी कितपत झाली आहे याचा अंदाज आलेला नसतो. त्यांच्याकडे स्वताच्या कामगिरीचे मोजमाप करण्याची कोणतीही यंत्रणा नसते, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा फारसा अनुभव नसतो. आता आपण मायकेल फेल्प्सचे उदाहरण पाहूयात - अथेन्स २००४ मध्ये त्याने स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सांगितलं होतं की मी प्रकारांमध्ये भाग घेणार असून सगळ्या प्रकारांमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. त्याला सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक मिळाले. हे भाकीत करताना त्याला कल्पना होती की आपल्याला इयान थॉर्प आणि पीटर वॅन हुगेनबॅंड या दिग्गज खेळाडूंशी सामना करायचा आहे. हा आत्मविश्वास आपल्या खेळाडूंमध्ये कधी दिसणार? ऑलिम्पिक पदक मिळालं म्हणजे आपलं आयुष्य सार्थ झालं का? आज २० वर्ष झाली, जवळपास शतकांची शतके झाली तरी सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूंना देखील कधी कधी टीकेला सामोरे जावे लागते. हे सातत्य आपल्याला इतर खेळांमध्ये कधी दिसणार?
आता काही नावांचा वरती उल्लेख केला होता त्यांची कामगिरी पाहूयात
लिएंडर पेस (४३ दुहेरी विजेतेपद, १२ ग्रॅंड स्लॅम विजेतेपद, १२ ग्रॅंड स्लॅम उपविजेतेपद)
महेश भूपती (४५ दुहेरी विजेतेपद, ११ ग्रॅंड स्लॅम विजेतेपद, ११ ग्रॅंड स्लॅम उपविजेतेपद),
विश्वनाथन आनंद (वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन)
यांचा आदर्श बाकीचे खेळाडू कधी घेणार?

वरती आपल्याला जे काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे शोधूयात. खेळाचा विकास करण्याची जबाबदारी ही एका पातळीवर खेळाडूंची तर दुसऱ्या पातळीवर त्या त्या क्रीडा संघटनांची असते, संघटनांनी खेळाला प्रोत्साहन देऊन खेळामध्ये पैसा कसा येईल आणि खेळाडूंना आर्थिक स्थैर्य कसे मिळेल या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. साहजिकच त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होऊन ते अधिक चांगली तयारी कामगिरी करू शकतील आणि आपण पहिल्या पातळीवर देखील यशस्वी होऊ. आपल्या राष्ट्रीय खेळ हॉकीची काय अवस्था आहे ते पाहूयात. के पी एस गिल नामक हिटलरच्या ताब्यात असलेल्या आणि गेले वर्ष वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या हॉकी इंडिया या संघटनेकडे खेळाडूंचे मानधन देण्याइतपत देखील निधी नव्हता, विश्वकरंडक डोळ्यासमोर ठेऊन खेळाडूंना संप करावा लागला तेंव्हा त्यांना त्यांचे पैसे मिळाले. यामधे संघटना, खेळाडू आणि आपला देश सगळ्यांचीच नाचक्की झाली. पुरुष हॉकीची ही कथा तर महिला हॉकी संघाचे कोच हे खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात अशी बाब पुढे आली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्या राष्ट्रीय खेळाच्या संघटनेची ही अवस्था तर बाकीच्या खेळांचे काय होणार ? अखिल भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेला वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले, कारण : खेळाडूंनी केलेले उत्तेजक द्रव्यांचे सेवन. अभिनव बिंद्रा आणि शूटिंग फेडरेशन मधला वाद चांगलाच गाजला, कारण : बिंद्राला संघटनेने, संघनिवडीपूर्वी पात्रता फेरीस सामोरे जाण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचा अपमान झाला!!! गगन नारंग नावाच्या शुटरने तर आता राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकायचे ठरवले आहे, कारण : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी त्याची निवड झाली नाही !!! आपण देशासाठी खेळतो की पुरस्कारासाठी ?
भारतीय ऑलिम्पिक संघटनेविषयी तर रोजच नवीन वाद आपण ऐकत आहोत. एकीकडे क्रिकेट विश्वकरंडकाच्या स्टेडीयम नूतनीकरणासाठी ७०-८० कोटी खर्च येत असताना राष्ट्रकुलच्या स्टेडीयमचा खर्च ४००-८०० कोटीच्या घरात कसा गेला याचे पण नवलच आहे. आज क्रिकेटर्सना मिळणारा पैसा सगळ्यांच्या डोळ्यात खुपतो, पण त्यासाठी संघटना आणि खेळाडू यांनी दोन्ही पातळ्यांवर केलेले प्रयत्न कोणी विचारात घेत नाही. आपल्याकडे खेळाचे व्यावसायिकीकरण हे प्रथम IPL च्या रुपात पहावयास मिळाले. युरोप मधे फ़ुटबॉल (जसे इंग्लिश प्रीमियर लीग) आणि अमेरिकेमध्ये बास्केटबॉल (NBA) मधे हा प्रकार सुमारे १०० वर्षांपासून सुरु आहे. आज क्रिकेटसारख्या खेळात अनेक राजकारणी विविध संघटनांचे पदाधिकारी म्हणून सक्रीय आहेत, फक्त क्रिकेट खेळात त्यांना रस असण्याचे कारण म्हणजे इथे असलेला पैसा आणि ग्लॅमर. त्यांना खरंच खेळाचा विकास करायची इच्छा असेल तर त्यांनी प्रत्येक खेळ वाटून घेतला पाहिजे. नाहीतर क्रिकेट आणि इतर खेळांमधली दरी अजून वाढणार यात काहीच शंका नाही.

राष्ट्रकुल
सारख्या स्पर्धेची तयारी करताना आपण वेळेत स्टेडीयम बांधू शकत नाही, बांधलेली स्टेडीयम निकृष्ट दर्जाची असतात, अनेक अधिकारी भ्रष्टाचारात अडकलेले आढळतात मग ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे स्वप्न आम्ही सोडून द्यायचे का?

~अमेय

Friday, July 30, 2010

सेहवाग की सचिन ??

ज्ञानेश:
मी सचिनचा फ़ॅन नाहीये
आणि द्रविडचा तर मुळीच नाही
पर्सनल स्कोरसाठी खेळणारी लोकं आहेत ही
Sehwag is best!!!


अमेय:
:)


ज्ञानेश:
सेहवाग गॉड आहे गॉड
३००च ३ वेळा
आवरा
सचिनच्या स्वप्नात सुद्धा ३०० आले नसतील


अमेय:
:)


ज्ञानेश:
द्रविड आपला मरत मरत १०० काढतो
सेहवागला तोड नाही !!!


अमेय:
मोठ्या लोकांना नाव ठेऊन आपण मोठं होत नसतो मित्रा
:)


ज्ञानेश:
इथे मोठं कोण आहे?
फक्त सेहवाग


अमेय:
सचिन, द्रविड


ज्ञानेश:
शीSSSS ईई
सचिन आणि द्रविड ?????????




या संभाषणावरून साहजिकच रण पेटलं !! आणि समस्त सचिन, द्रविड प्रेमींची बाजू मांडण्याची जबाबदारी मी घेतली!! काम तसं सोपं होतं :-)


अमेय जांभेकर - ज्ञानेश मित्रा, आपले खाजगी मध्ये चाललेले वाद चव्हाट्यावर आणून मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या. पण तुला हे दाखवून द्यायचं होतं की आज लोकांच्या मनात सचिन, द्रविड या खेळाडूंचं काय स्थान आहे ते. सचिन विषयी तोंडातून नुसता ब्र काढल्या काढल्या १५ मिनिटात २५ पेक्षा जास्त (जळजळीत!!) प्रतिक्रिया आल्या (त्या पण जगभरातून !!!) तरी पण तुझ्या स्वैर गोलंदाजीचा आपल्या कसलेल्या फलंदाजांनी घेतलेल्या समाचाराबद्दल माफी मागतो आणि माझे म्हणणे मांडायला घेतो.


सर्वप्रथम आपण जेंव्हा सांघिक खेळाविषयी बोलतो तेंव्हा २ खेळाडूंची तुलना करणे मला योग्य वाटत नाही आणि ते पण एकाच संघामाधल्या तर नाहीच - सेहवाग खेळला की सचिन खेळला याला महत्व नाही. संघ जिंकला का हे महत्वाचे आहे. इथे सामना २ संघांमध्ये आहे, खेळाडूंमध्ये नाही. आपल्या कामगिरीचा संघाच्या कामगिरीवर नक्कीच परिणाम होणार हे प्रत्येक खेळाडूला माहित असते. संघाच्या यश-अपयशावर आपले यश अपयश अवलंबून असते हे पण तितकेच खरे आहे. अशा परिस्थितीत कोणी खेळाडू संघाचा विचार सोडून केवळ स्वतःच्या कामगिरीचा विचार करेल हे मनाला पटत नाही. तू जर एक गोष्ट पहिली असशील तर ती म्हणजे सेहवाग फालतू आहे अशी कॉमेंट कोणीच टाकली नाहीये, सगळ्यांचा रोष सचिन आणि द्रविडला कमी लेखल्याबद्दल होता. तुझ्या मतांचा आम्ही आदर करतो पण एखादा संघ, खेळाडू महान आहे किंवा तुला तसे वाटते, म्हणजे बाकीच्या खेळाडूंना तू कमी लेखू शकत नाहीस. माझा आक्षेप याच गोष्टीला आहे. जर्मनीचा संघ तरुण खेळाडूंचा आणि उत्तम सांघिक कामगिरी करणारा संघ होता, पण तू स्पेन फालतू आहे म्हणालास ते चुकीचं होतं. आणि स्पेनच्या संघाने ते दाखवून दिलं.
आता तुझं म्हणणं आहे की सचिन, द्रविड हे खेळाडू स्वतःसाठी खेळतात :


प्रथम द्रविड विषयी बोलूयात
द्रविड या माणसाविषयी मला अतिशय सहानुभूती आहे. त्याने नेहमीच पडद्यामागे राहून, वेळ प्रसंगी दुय्यम भूमिका घेऊन संघाचे हित पहिले आहे असं मला वाटतं ............ सांगतो कसं ते ........ द्रविडचा संघाने (गांगुलीने!!! ) नेहमीच आपल्याला हवा तसा उपयोग करून घेतला : एक अतिरिक्त फलंदाज खेळवता यावा म्हणून त्याच्यावर २००२-२००३ मध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी टाकली. कधी सलामीचा फलंदाज नाही म्हणून कसोटीमध्ये त्याला सलामीला पाठवण्यात आलं. कधी त्याने ६ व्या क्रमांकावर येऊन सामना एकहाती काढून दिला. अगदी त्याचा पदार्पणाचा सामना आठवावा. त्याच सामन्यात गांगुलीने देखील पदार्पण केले होते, त्याने शतक ठोकले त्यामुळे त्याची कामगिरी लक्षात राहिली पण द्रविडला शतकासाठी ५ धावा कमी पडल्या तर आपण लगेच ती कामगिरी विसरून गेलो. २००१ मध्ये आपण फोलो-ओन नंतर ऑस्ट्रेलियाला हरवले तेंव्हा लक्ष्मणचे कौतुक झाले पण द्रविडने देखील १८१ धावांची खेळी केली होतीच ना? या सगळ्यात स्वतःचे हित कुठे पहिले त्याने?? २००३-०४ चा ऑस्ट्रेलिया दौरा तर त्यानेच गाजवला. त्याचं चीज म्हणून त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं आणि नंतर ICC चा मोसमातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब देखील मिळाला. संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढून सामना जिंकून देणे ही द्रविडची शैली तर सुरवातीपासून विजयाचा पाया रचणे आणि सामना जिंकून देणे ही सचिनची शैली.


सचिनविषयी काही बोलायची गरज आहे का? तरी पण थोडं सांगतो
त्याच्या खेळ्या आणि त्याचे तंत्र या विषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ..........
कोणत्याही संघाशी आणि कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटशी (कसोटी, एक दिवसीय आणि टी२०) जुळवून घेणे ही सचिनची खासियत. त्यामुळेच आज तो २० वर्ष पाय घट्ट रोवून उभा आहे. १९८९ मध्ये पदार्पण झाल्यापासून आजपर्यंत तो ७ वेगवेगळ्या कर्णधारांसोबत खेळला आहे पण कोणत्याही प्रकारचा वाद कधी उदभवलेला आपण ऐकला नाही, कारण? ते संघहिताचे नाही हे सचिनला माहित आहे. आज टी २० न खेळण्याचा निर्णय हा पण संघ हिताचाच भाग म्हणावा लागेल. त्यावरून असा निष्कर्ष काढण्याचा पण प्रयत्न झाला की सचिनला या प्रकाराशी जुळवून घेण्यात त्रास होतो वगैरे. पण यंदाच्या आयपीएल मध्ये त्याने हा मुद्दा खोडून काढला. आकड्यांवर विश्वास आहे का? सचिनला एकदिवसीय सामन्यांमध्ये ६१ वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्यापैकी ५५ सामने भारताने जिंकले आहेत .......... मग तो संघासाठी खेळत नाही म्हणणे योग्य आहे का?


प्रती-आक्रमण करून समोरच्या संघाला हतबल करायचं ही सेहवागची शैली. तांत्रिक दृष्ट्या तो सचिन, द्रविड यांच्या जवळपास देखील नाही पण तरी त्याच्या शैलीने सगळ्यांनाच भुरळ पाडली हेही खरं. सोबर्स, व्हिव रिचर्डस या जुन्या खेळाडूंनी पण त्याचं कौतुक केलंय. पण सेहवाग मोकळेपणाने का खेळतो याचा विचार केलाय का कधी? कारण त्याच्यावर अपेक्षांचे ओझे नसते. आपल्यानंतर सचिन, द्रविड सारखे फलंदाज आहेत हे त्याच्या मनाला माहित असते. सेहवागवर आपला संघ कधीच अवलंबून नसतो कारण तो अगदी पुढच्याच चेंडूवर देखील बाद होऊ शकतो, हे सगळ्यांनाच माहित असते अगदी त्याला स्वतःलासुद्धा. त्यामुळे त्याने केलेल्या धावा ह्या संघासाठी नेहमी बोनस ठरतात. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्या कामगिरीला किंवा गुणवत्तेला आव्हान देतोय.


एक परिपूर्ण संघ तयार होण्यासाठी संघात असे सेहवाग, द्रविड, सचिन असावे लागतात तरच १ ल्या क्रमांकाचे शिखर गाठता येते!!!!

~अमेय

Incredible !ndia